संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार 
(reliance jio wil  launch 5G Network)असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी यावर भाष्य केलं. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावेळी रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.

“5G स्पेक्ट्रमसाठी आवश्यक परवाने देण्यास सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी जिओ सज्ज आहे,” असं अंबानी म्हणाले. इतकंच नाही तर हे तंत्रज्ञान आपण जगामध्ये निर्यात करण्याक्षम असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा दाखला देत जिओ याच दिशेने वाटचाल करत असल्याचे आणि संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा केवळ वापरच नाही तर जगाला डिजिटल तंत्रज्ञान निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य ठेवल्याचंही यावेळी नमूद केलं. जिओचं तंत्रज्ञान शून्यापासून निर्माण केलेलं असून १०० टक्के भारतीय आहे. जिओ आता शून्य कर्ज असलेली कंपनी असल्याचे सांगताना जिओ प्लॅटफाॅर्म्समध्ये गुगल करत असलेल्या ३३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा दाखलाही त्यांनी दिला.
एकमेव क्लाउड बेस्ड व्हिडीओ अॅप
“जिओ मीट हे एकमेव क्लाउड बेस्ड व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप आहे. केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत जिओ प्लॅटफॉर्म टीमनं हे अॅप तयार केलं. हे अॅप रिलिज केल्यानंतर काही दिवसांच्या आतच ५० लाख ग्राहकांनी ते डाऊनलोड केलं,” अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. करोना व्हायरसचं संकट आपल्यासमोर एक आव्हान घेऊन उभं राहिलं आहे. परंतु भारत आणि संपूर्ण जग वेगानं यातून बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रिलायन्स सर्वाधिक जीएसटी देणारी कंपनी
रिलायन्सने आतापर्यंत २ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक किंमतीची निर्यात केली आहे. तसंच रिलायन्स ही सर्वाधिक जीएसटीची रक्कम भरणारी (६९ हजार ३७२ कोटी रूपये) कंपनी असल्याचंही अंबानींनी सांगितलं. सेमी कंडक्टर इंडस्ट्रिजमधील दिग्गज इंटेल आणि क्वालकॉम डिजिटल हे इकोसिस्टमचे हृदय मानले जातात. रिलायन्स भारत आणि भारतीयांसाठी नव्या उत्पादनांना विकसित करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान
“4G, 5G, क्लाउड कम्प्यूटिंग, डिव्‍हाइसेस आणि ओएस, बिग डेटा, एआय, एआर / व्हीआर, ब्लॉकचेन, नॅचरल लॅगवेज अंडरस्टँडिंग आणि कंम्प्युटर व्हिजनसारख्या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान निर्माण केल्याची माहितीही त्यांनी दिली.
JioTV+ लाँच  (reliance jio wil  launch 5G Network)
आकाश अंबानी यांनी या सर्वसाधारण सभेदरम्यान JioTV+ लाँच केलं. JioTV+ मध्ये जगातील १२ मोठ्या OTT कंपन्यांचे कंटेन्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar, Voot, SonyLiv, Zee5, JioCinema, JioSaavn, YouTube यासारख्या अॅप्सचा समावेश असल्याचंही ते म्हणाले.