जिल्ह्यात सध्या 641 व्यक्‍ती कोरोनाबाधित   असून, ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर या नियमाचे पालन करून अनावश्यक गर्दी टाळावी; अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा स्पष्ट इशारा  पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात  मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना सद्य:स्थितीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.  सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्‍त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आदी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची आजपर्यंतची संख्या 641 झाली आहे. 304 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी अकरा रूग्णांची स्थिती चिंताजनक आहे.   आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 474 तर  शहरी भागात 67 लोक आहेत. 
जिल्ह्यात  200 कंटेनमेंट झोन असून   कंटेनमेंट झोन आराखड्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. जिल्ह्यात झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये.  राज्यमंत्री  कदम म्हणाले, पुणे, मुंबईतून  जिल्ह्यात  मूळगावी आलेले चाकरमानी पुन्हा मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी अल्पकालावधीसाठी ये-जा करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास हातभार लागत आहे. अशा लोकांचे कोरोना हॉटस्पॉटमध्ये  ये-जा करणे बंद झाले पाहिजे.   
ते म्हणाले,राज्य आपत्ती दलाकडे मागणी केलेल्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. तो निधी लवकरच उपलब्ध होईल .  जिल्हाधिकारी डॉ.  चौधरी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती देऊन मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे   आयसीयु बेडची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
 ...अन्यथा पोलिसांनी कठोर कारवाई करावी
मंत्री पाटील म्हणाले, ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत त्या ठिकाणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. पन्‍नास वर्षांवरील आणि आजारी असलेल्या नागरिकांच्या सर्व्हेसाठी महानगरपालिका क्षेत्रात 20 प्रभागांमध्ये 20 पथके कार्यरत करण्यात आली आहेत. लवकरच हा सर्व्हे पूर्ण करण्यात येईल.